Skip links

‘फिटनेस’ आणि ‘आरोग्य’

‘फिटनेस’ आणि ‘आरोग्य’ या दोन्ही गोष्टी खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 
शरीर निरोगी आहे पण वजन खूपच वाढलंय, चालण्या फिरण्याची सवय मोडलीये …
किंवा वजन योग्य आहे, फिटनेसही चांगला आहे पण सारखं आजारपण येतंय ….
या दोन्ही परिस्थितींत आयुष्यातील अनेक आनंद आणि अनुभवांना मुकावे लागते…
त्यामुळे या दोन्हींचा योग्य समतोल राखणं हाच आनंदी ( आणि  दीर्घ ) आयुष्य जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे !
उत्तम आरोग्य असणे हे अनेक बाबींवर अवलंबून असते. आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये प्रामुख्याने आपला आहार, विहार, विचार, पर्यावरण आणि अनुवंशिकता यांचा प्रामुख्याने समावेश होतो.


आहार – समतोल, स्वच्छ, नैसर्गिक व पौष्टिक असणे.
विहार – पुरेशा प्रमाणात नियमित शारीरिक हालचाल व व्यायाम तसेच योग्य प्रमाणात झोप व विश्रांती.
विचार – मानसिक  समाधान व आर्थिक/कौटुंबिक/ सामाजिक सौख्य व स्थैर्य.
पर्यावरण – आपल्या भोवतालच्या हवा, पाणी आणि अन्नाची शुद्धता.
अनुवांशिकता – आपल्या आई वडीलांकडून आपल्याला मिळालेला जनुकीय म्हणजेच नैसर्गिक वारसा.


यापैकी शेवटचा म्हणजे अनुवांशिक वारसा हा आपल्याला लागलेल्या जनुकीय ‘लॉटरी’ चा भाग सोडून बाकीच्या गोष्टींबाबत आपण स्वप्रयत्नाने काही तरी करू शकतो. काही लोकं मात्र उत्तम आरोग्य हा निसर्गाने आणि त्यांच्या नशिबाने मिळालेला अमूल्य आणि ‘फुकट’चा वारसा वाया घालवतात. चांगले पाय मिळाले पण स्वतःच्या हाताने त्यावर धोंडा हाणून घेण्याचाच हा प्रकार आहे.


फार कमी असे असतात की जे सर्व नीती नियम तोडून अथवा बिनधास्त, बेफिकीर, बिनदिक्कत आयुष्य जगूनही त्याची किंमत त्यांना मोजावी लागत नाही.
कितीही चांगला नैसर्गिक वारसा असला तरी त्याला जतन करणे आणि तो शाबूत राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे, यातच खरं शहाणपण आणि माणूसपण आहे. 

वडिलोपार्जित मिळालेला निरोगी  शरीराचा वारसा टिकवायचा असेल तर तो जपून वापरावाच लागेल. बँकेत ठेवलेल्या पैशांवर व्याज मिळतं पण वेळोवेळी खर्च सुध्दा होत असतात, त्यामुळे मूळ मुद्दल शाबूत ठेवायची असेल तर अधून मधून थोडी त्यात स्वकष्टाने मिळवलेल्या धनाची भर सुद्धा घालावीच लागते.नाहीतर नुसतंच खर्च करत राहिलो तर एक दिवस खातं रिकामं होणार हे नक्की !


त्यामुळेच आरोग्य आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखत, आपल्या आयुष्याचा बँक बॅलन्स जुळवण्यासाठी सातत्याने त्यादृष्टीने प्रयत्न करण्यातंच खरा ‘राम’ आहे.
फिट ( म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्षम ) आणि हेल्दी ( निरोगी ) राहण्यासाठी आमचीच पद्धत सर्वोत्तम आहे असं सांगणाऱ्या  शेकडो प्रकारच्या जाहिरातींचा अक्षरशः भडिमार आजकाल आपल्यावर चहुबाजूंनी होत असतो. व्यायामाचा नाहीतर आहार तंत्राचा एखाददुसरा नवीन प्रकार अधून मधून ( हल्ली सोशल मीडियामुळे जास्तच ) उदयाला येतंच असतो.आमचा व्यायाम, आमचा डायट, आमची पद्धतच कशी श्रेष्ठ आहे, हे सांगण्याची चढाओढच लागली आहे जणू. आणि प्रत्येक पद्धतीचे चाहते आणि त्याचे टीकाकार, असे दोन गट पडलेले दिसतात. सोशल मीडिया आणि इतर दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या या माऱ्यातून नक्की कोणता मार्ग आपल्यासाठी नेमका लागू पडेल बरं ?कुणीतरी गुरू किंवा एक शंभर टक्के जालीम ( आणि शक्यता करायला सोपा ) उपाय भेटेल काय आपल्याला –  अशी भोळी भाबडी आशा वाटणं स्वाभाविक आहे, पण असले चमत्कार काही प्रत्यक्षात होत नसतात.
चांगलं आरोग्य राखणं आणि फिट राहणं खूप अवघड खरंच नसतं, पण बसल्या बसल्या आपल्या पदरात कुणी ते आणून टाकेल अशी अपेक्षा ठेवण्याची गफलतही कुणीच करू नये. 
उलट आपल्या भरलेल्या झोळीतील ही आरोग्यरूपी शिदोरी आपल्याच अनास्थेमुळे ‘चोरीला’ जाऊ नये यासाठी सातत्याने जागरूक राहून प्रयत्नवादी राहणे जरूरी आहे.केल्याने होत आहे रे….
पुढच्या लेखापासून फिटनेसचे विविध पैलू आणि त्यासाठी उपलब्ध विविध पर्याय आपण पाहणार आहोत.

Leave a comment