Skip links

क्विट शुगर – फिट फिगर

मला बऱ्याचदा माझे धावपटू मित्र विचारतात – ” इतका पळतोय मी, तरी मग पोट का अजून कमी होत नाहीये ?” किंवा
“वजन का कमी होत नाही ?”
सहसा मॅरेथॉन किंवा लांब अंतर नियमितपणे धावायला लागल्यावर वजन कमी होणं स्वाभाविकच आहे.
पण काही मॅरेथॉनपटू मात्र फारसे बारीक होत नाहीत किंवा त्यांचं ‘पोट’ / ‘ढेरी’ काही केल्या कमी होत नाही, हेही खरंय.

का होत असावं बरं असं ?

माणूस या पृथ्वीतलावर येताना आपल्या सोबत स्वभाव, रंगरूप, वजन, आरोग्य, शरीराची ठेवण अशा काही गोष्टींचं ‘गाठोडं’ घेऊनच जन्माला येत असतो.

यापैकी काही गोष्टी तो प्रयत्न करून थोड्या फार बदलू शकतो, पण शेवटी अनुवांशिकता, म्हणजेच आई वडिलांकडून मिळालेले ‘जीन्स’ हे खूप महत्वाचे असतात. त्यामुळे एखाद्याचं वजन पटापट कमी होतं, तिथं दुसऱ्याला खूप अवघड जातंय असं पहायला मिळतं.

यातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे खाणं पिणं!
आपण इतकं पळतोय म्हणून काही लोकं रेटून खातात.
पळून घरी गेल्यावर समोर दिसेल त्याच्यावर ताव मारून कसं वजन कमी होणार!

म्हणजे पाच किलोमीटर पळून तीन चारशे कॅलरीज (उष्मांक) जाळायच्या आणि दोन बुंदीचे लाडू तोंडात कोंबुन तेवढ्याच परत मिळवायच्या! शिवाय नेहमीचं जेवण असतंच. सडकून भूक लागल्यामुळे तेही नेहमीपेक्षा जास्तच खाल्लं जातं.

मग उपाय काय यावर?
उपासमार करा, पोट मारा असं नाही म्हणत मी, पण वजन कमी करायचं असेल, पोटाची ढेरी घालवायची असेल तर आपण काय आणि किती खातो, पीतो याबद्दल जागरूक रहावंच लागेल.
लाडुऐवजी एखादं गाजर किंवा काकडी खा की राव!

आज समाजात वाढत चाललेल्या मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सगळ्या समस्यांचे मूळ
व्यायाम आणि हालचालीची कमतरता यात आहेच, पण त्यासोबतच पौष्टिक आणि समतोल आहाराकडे झालेलं दुर्लक्ष हेही तितकंच महत्वाचं आहे.

‘साखर’ हा या बाबतीत आपला सर्वांचा शत्रू नंबर वन आहे. जुन्या काळी वर्षातून कधीतरीच सणासुदीला गोड-धोड मिळायचं, पण हल्ली अगदी सहज मिळत असल्यामुळे साखर घातलेले पदार्थ कळत नकळत कायम आपल्या आजूबाजूला खुलेआम मिळत असतात.

बसल्या बसल्या दिवसातून सात आठ वेळा चहा ढोसणे किंवा जेवण झाल्यावर ‘डेजर्ट’ च्या नावाखाली एखादी स्वीट डिश किंवा आईस्क्रीम खाणे ही सुद्धा एक फॅशन होऊ पाहतेय.
दारूला आणि दारूच्या दुकानाला सगळेच वाईट म्हणतात, नावं ठेवतात पण कुणी मिठाईच्या दुकानांना वाईट म्हणतं का?

घरी आलेल्या पाहुण्यांना स्वीट डिश, आईस्क्रीम आग्रहाने खायला घालताना आपण विचार करतो का ?
अरे तो जेवलाय छान पोटभरून.. पोट आधीच सुटलय त्याचं, मग कशाला अजून प्रेमाची जबरसदस्ती करताय?

पत्रिका द्यायला आलेल्या मित्राने आधीच चार ठिकाणी चहा घेतलाय पण तरीही त्याला कशाला चहा पाजताय पुन्हा ?

वरवर या सर्व गोष्टी किरकोळ वाटतील पण यातूनच नकळत आपण अनारोग्याला निमंत्रण देत असतो . अशाच छोट्या छोट्या चुकीच्या सवयी पुढे जाऊन आपली लाईफ स्टाईल बनून जातात.

म्हणून आत्तापासूनच जागरूक राहूया आणि आपल्या खण्यापिण्याकडे जरा लक्ष देऊया. मग ढेरी सुद्धा हळू हळू कमी होईलंच!

Leave a comment