Skip links

तुम्ही फिट तर जिंदगी हिट!

चालण्या- पळण्याचे, सक्रिय जीवनशैलीचे, नियमित व्यायामाचे अनेक फायदे असतात हे समजायला, उमगायला, पटायला फार कठीण नसतं.

आपल्याला सगळ्यांनाच हे माहित असतं. तंदुरुस्त म्हणा अगर फिट म्हणा, एकदा अशा प्रकारच्या जीवनशैलीची सवय जडली की मग ती तशी चालू ठेवायला तितकासा त्रास होत नाही.

पण कधीतरी, कुठेतरी सुरुवात करणं महत्वाचं असतं. आणि खरी मेख इथंच आहे !

मला करायचंय हो सुरू पण कशी करू, कधी करू, पुढल्या आठवड्यात, पुढल्या महिन्यात करतो असं काहीतरी स्वतःला सांगून आपणच आपली समजूत काढून स्वतःलाच फसवत राहतो !

बरं काम खूप आहे, आज अमुक कार्यक्रम आहे, उद्या तमुक ठिकाणी जायचंय, काल झोपायला उशीर झाला, आधी वजन कमी करू मग पळायला सुरुवात करू, अशी एक ना अनेक निमित्तं असतातंच. 

मग या सर्वातून मार्ग काढून या ‘फिट’ जीवनशैलीचा श्रीगणेशा करावा तरी कसा ?

यावर रामबाण उपाय किंवा जादूची छडी माझ्याकडे मुळीच नाहीये. पण अनुभवाच्या आधारे एक मार्ग नक्की माहित झाला आहे, जो मी तुम्हाला आज सांगणार आहे !

समोर एखादं ध्येय, टार्गेट अथवा गोल ( इंग्रजीतला )  असल्याशिवाय त्या दिशेने आपली वाटचाल दमदारपणे होत नाही.

आणि नुसतेच ध्येय असून सुद्धा उपयोग नाही तर त्या ध्येयाला वाहून घेतलं पाहिजे, म्हणजे कमिटमेंट झाली पाहिजे. फिटनेसचं अंतिम ध्येय समोर ठेवून त्या दिशेने कूच करण्यापुर्वी वाटेत टप्प्या टप्प्याने करण्याजोगी छोटी छोटी टार्गेट ठेवायला हवीत. मी ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन पळणार हे ध्येय असायला हरकत नाही, किंबहुना असंच एखादं मोठ्ठं, असाध्य किंवा कठीण वाटणारं स्वप्नच आपल्याला त्यादिशेने प्रवास सुरू करताना प्रेरणा देत असतं.

याबाबतीत माझा एक अगदी ताजा अनुभव सांगतो- साधारण एक महिन्यापुर्वी मी मुंबईतील सावरकर सभागृहात ‘स्वयं टॉक्स’ या कार्यक्रमात सातारा हिल मॅरेथॉन व माझ्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल व्याख्यान दिलं. ते ऐकून मध्यंतराला अनेक लोक मला भेटले आणि म्हणाले आम्हाला सुद्धा सुरुवात करायची आहे, कशी करू ? या ग्रुप मध्ये मुंबईच्या निर्माण रियलटर्स या कंपनीचे श्री अजित मराठे हेसुद्धा होते.

माझं उत्तर – पहिल्यांदा आजपासून किमान १ किंवा २ महिन्यांनी होत असलेल्या एखाद्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी नाव नोंदवून टाका. म्हणजे एकदम २१  किंवा ४२ नव्हे, तर ५ किंवा जास्तीत जास्त १० किलोमीटर साठी नाव नोंदवा.

एकदा का तुम्ही स्वतःला कमिट केलं की मग आपोआप आपली पावले त्या दिशेने पडू लागतात.

लहानपणी नाही का परीक्षा जवळ आली की नापास होण्याच्या भीतीनं झक मारत अभ्यास करावा लागायचा ?

तसंच असतं हेसुदधा !

हे ऐकून किती लोकांनी तसं केलं मला माहित नव्हतं, पण कालच याबाबतीत एक सुखद बातमी मिळाली. मराठे साहेबांचा व्हाट्सऍप वर मेसेज आणि गळ्यात मेडल घातलेला फोटो  आला. म्हणाले डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाव नोंदवलं आणि कालच्या रविवारी 4 किलोमीटर ची फन रन पूर्ण केली.  अशा प्रकारे मराठे कुटुंबाचा हा फिटनेस प्रवास आता सुरू झाला आहे !

हा लेख वाचून तुम्हाला सुद्धा वाटतंय ना असंच काहीतरी करावंसं ? 

मग उठा आणि नाव नोंदवून टाका जवळपासच्या एखाद्या मॅरेथॉनसाठी !

तुमच्या एखाद्या धावणाऱ्या मित्राला किंवा रनिंग ग्रुपला शोधून काढा आणि त्यांच्यासोबत सुरुवात करा, त्यांच्याकडून बेसिक माहिती घ्या, नाहीतरी आजकाल गूगल सर्च करून सुद्धा सगळी माहिती मिळतेच की !

आणि सुरूवात करा तुमच्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाची !

तुम्ही फिट तर जिंदगी हिट!

तुम्ही तंदुरुस्त तर सगळंच मस्त !

Leave a comment