Skip links

अतिरेक नको, समतोल हवा

तंदुरीस्तीसाठी व्यायाम, खेळ , नियमित हालचाल हे सर्व जरूरी आहेत. शरीर आणि मनाला शिस्त लावायला कष्ट पडतात. या सवयी   कायम राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात.

त्यामुळे जर कोणी आपला नोकरी धंदा, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, वेळात वेळ काढून आपल्या स्वास्थ्यासाठी शिस्तबद्ध जीवनचर्या व्यतीत करत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे.

पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचे दुष्परिणाम सुदधा नक्कीच होतात.

 म्हणजेच एका टोकाला अशी लोकं असतात की ज्यांना कितीही सांगितलं तरी ती काही केल्या व्यायाम करणे, स्वास्थ्यवर्धक आहार घेणे, वजन संतुलित राखणे अशा गोष्टींच्या भानगडीत अजिबात पडत नाहीत. वाढू दे वजन कितीभी, आम्ही पाहिजे ते आणि वाट्टेल तेव्हा खाणार. व्यायाम नाही करणार, चालणार नाही आणि जागेवरून हलणारसुद्धा नाही अशी माणसं एका टोकाला असतात तर दुसऱ्या टोकाला सुद्धा काही लोकं असतात.

म्हणजे व्यायाम आणि आहार यांच्या बाबतीत जागरूक राहणं ठीक आहे पण या गोष्टींचा अतिरेक करणारेही असतात.

म्हणजे शिस्त चांगलीच पण शिस्तीच्या नावाखाली जीवन जगायचंच विसरून जाणं हेसुद्धा ठीक नाही.

म्हणजे डायट वर लक्ष ठेवायला पाहिजेच पण कधी कधी थोडी ढील देऊन आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींतील आनंद सुध्दा घेता आला पाहिजे. 

उदाहरणार्थ रखरखीत उन्हात तुम्हाला वाटेत जर कधीतरी एखादं रसवंती गृह दिसलं तर एखादा ग्लास थंड उसाचा रस हाणण्यात सुद्धा वेगळीच मजा असते, तिथं जर सारखंच कॅलरिज मोजत बसलो तर अवघडच आहे ! हो आता जर तुम्ही आनंद घेण्याच्या नावाखाली चार पाच ग्लास रस रिचवाल तर तेसुद्धा नक्कीच तेही चांगलं नाहीये.

आरोग्यासाठी वेळेवर झोपणं , जेवणं, उठणं वगैरे जरुरीचं आहेच पण अधून मधून थोडंसं चीटिंग करून उशिरा रात्रीपर्यंत मित्रांसोबत गप्पा मारण्यात पण वेगळीच मौज असते, नाही का ?

म्हणजे काय तर एक बाजूला कडक शिस्त आणि तपश्चर्या यांचं बंधन आणि दुसऱ्या बाजूला बेधुंद, बेफाम, बेलगाम जगण्याचं आकर्षण !

या दोन टोकाच्या अवस्थेतून आदर्श, सुखी आणि स्वस्थ जीवनाचा मध्य बिंदू साधता येणं हे सोप्पं नक्कीच नाहीये!

‘ To be or not to be ‘  अशी हॅम्लेट सारखी दोलायमान स्थिती सामान्य माणसाला सतत चॅलेंज करीत असते.

आपण सर्वसाधारण माणसं आहोत, व्यावसायिक खेळाडू नाही, मग कशाला टोकाचे कठीण शारीरिक श्रम करावेत. पण मग काहीच नाही केलं तरी पोट सुटतंय, वजन वाढतंय, आजारपण येतंय !

शेवटी सगळं येतं ते समतोल राखण्याच्या तुमच्या कुवतीवर..

साताऱ्यात आता पळण्याच्या ‘क्रेझ’ ची बऱ्यापैकी लागण झालीये, पण पळण्याचा अतिरेक सुद्धा होऊ नये असं मला वाटतं.

आपल्यापेक्षा दुसऱ्याला ‘दाखवायला’ पळायचं , जास्तीत जास्त मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा, अति वेगानं पळायचं, अशा मुळं एखादी दुखापत झाली तर मग पाश्चात्तापाची पाळी येते.

म्हणूनच दीर्घ कालीन दृष्टिकोन ठेवून समतोल राखणं, सुवर्णमध्य साधण्याचा सातत्याने प्रयत्न करणं सुद्धा जरुरीचं आहे !

Leave a comment